गिरीश आंदे
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ब्राह्मणी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळमेश्वर या मार्गावर भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकतेचा उत्स्फूर्त आविष्कार पाहायला मिळाला. दुचाकींवर तिरंगा फडकवत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
यावेळी विधान परिषद आमदार डॉ.राजीव पोतदार,आमदार डॉ.आशिष देशमुख,भाजपा नागपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिरंग्याप्रती असलेला अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त करणारी ही रॅली ठरली. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.




