Home Breaking News ग्राहक शोषण रोखण्यासाठी अभ्यासू कार्यकर्त्यांची गरज : डॉ. नारायण मेहरे

ग्राहक शोषण रोखण्यासाठी अभ्यासू कार्यकर्त्यांची गरज : डॉ. नारायण मेहरे

55
0

नागपूर
नफेखोर प्रवृत्तींमुळे सर्वच क्षेत्रात होणारे ग्राहक शोषण रोखण्यासाठी ग्राहकांचे योग्य प्रबोधन आवश्यक आहे. यासाठी ग्राहक चळवळीत विविध विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारण्याची गरज असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी व्यक्त केले. अमरावती येथील प्रयास भवन येथे आयोजित एकदिवसीय प्रांत बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीचे उद्घाटन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. मंचावर पश्चिम क्षेत्र संघटक नितीन काकडे, प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी, प्रांत संघटक अभय खेडकर, उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार आणि नगीन दास बैरागी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ. अविनाश सावजी यांनी भ्रामक जाहिरातींच्या दुष्परिणामांवर भाष्य करत तरुणांना संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तर पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री नितीन काकडे यांनी नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेचे वृत्तांत सादर करत संघटन विस्तार, कोष व्यवस्थापन, ग्राहक मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यास वर्गांवर चर्चा केली. महावितरण, पर्यावरण, ऑनलाइन गेम्स आणि शालेय प्रबोधन यासारख्या मुद्द्यांवर मुक्त संवाद झाला.
डॉ. मेहरे पुढे म्हणाले, “सामान्य ग्राहकाला उत्पादनांविषयी पुरेशी माहिती नसते, त्यामुळे त्याची फसवणूक होण्याची शक्यता असते. ग्राहकांना व्यावहारिक माहिती देण्याची जबाबदारी चळवळीतील कार्यकर्त्यांची आहे. ग्राहक पंचायत ही जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करते. यातून अधिक अभ्यासू कार्यकर्ते तयार होणे आणि संघटन सर्वस्पर्शी होणे गरजेचे आहे.”
बैठकीच्या सुरुवातीला अमरावती जिल्हाध्यक्ष अशोक हांडे यांनी स्वागतपर भाषण केले, तर प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मेघा ठाकरे यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनही डॉ. चौधरी यांनी केले. डॉ. चंदनसिंग राजपूत, उपाध्यक्ष अॅड. आशा दाभाडे, महानगर अध्यक्ष प्रदीप सगणे, किरण गरिबे, दिनेश पांडे, मधुकर भोपाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
प्रांत आयटी सेल प्रमुख चंद्रशेखर साठे, नागपूर जिल्हाध्यक्ष संजय साळवे, प्रभाकर शिवणकर, मंजितराव देशमुख, विनोद बोरकर यांच्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि प्रांत कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. भगवान पाटील, रेखा रेखे, अनिल वानखडे, संतोष डोमाळे, प्रवीण पाटील, संजय आयलवार, प्रदीप सगने, आशा दाभाडे, किरण गरिबे, मधुकर भोपाळे, सुखदेव तरडेजा यांनी बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
दिवसभर चाललेल्या या बैठकीत ग्राहक चळवळीच्या सक्षमीकरणासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. ग्राहक प्रबोधनाचे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि अभ्यासू कार्यकर्त्यांची फळी वाढवण्यासाठी ठोस नियोजन करण्यात आले.
ही बैठक ग्राहक चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here