Home राजकीय नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी डॉ.राजीव पोतदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी डॉ.राजीव पोतदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

2
0

गिरीश आंदे
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ज्येष्ठ संघटननिष्ठ नेते डॉ. राजीव पोतदार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयातून पक्षाने पुन्हा एकदा निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची परंपरा कायम असल्याचा संदेश दिला आहे.
रविवारी रात्री उशिरा भाजप नेतृत्वाने विधान परिषद निवडणूक व पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. त्यामध्ये नागपूर पोटनिवडणुकीसाठी डॉ. राजीव पोतदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
ही जागा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रिक्त झाली होती. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर अनेक नावांची चर्चा होती. मात्र, संघटनेत दीर्घकाळ सक्रिय राहून पक्षविस्तारासाठी कार्य करणाऱ्या डॉ. राजीव पोतदार यांना संधी देत भाजपने कार्यकर्ता-केंद्रित राजकारणाचा आदर्श कायम ठेवला आहे.
डॉ.पोतदार यांनी विदर्भात भाजप संघटना बळकट करण्यासाठी, नवीन कार्यकर्ते जोडण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. शांत, संयमी, अभ्यासू आणि संघटनेप्रती पूर्णतः समर्पित अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी सकाळी हजारो भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. पोतदार यांच्या समर्थनार्थ भव्य शक्तिप्रदर्शन केले. संविधान चौकातून सुरू झालेली रॅली आकाशवाणी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. मार्गभर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवाराचे उत्साहात स्वागत केले.
दुपारी सुमारे 12 वाजता डॉ. राजीव पोतदार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,राज्यमंत्री आशीष जयस्वाल,आमदार आशिष देशमुख,आमदार चरणसिंग ठाकूर,भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, भाजप नागपूर ग्रामीण (काटोल) अध्यक्ष मनोहर कुंभारे,महापौर नीता ठाकरे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजप-महायुतीची मजबूत पकड असल्याने डॉ.राजीव पोतदार यांची उमेदवारी प्रभावी मानली जात आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार,अनेक वर्षे कोणतीही अपेक्षा न ठेवता संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाने योग्य सन्मान दिला आहे.
डॉ. राजीव पोतदार यांची उमेदवारी हा केवळ राजकीय निर्णय नसून संघटननिष्ठा, मेहनत आणि समर्पणाचा गौरव असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. हा निर्णय पक्षासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही मत व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here