सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल तसेच इतर मंत्र्यांची निर्दोष मुक्तता दिल्या बद्दल सावनेर येथे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आनंदोत्सव व्यक्त केला.
कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे न्यायपालिकेवरील काही काळापासून डळमळीत झालेला विश्वास पुन्हा दृढ झाला असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. “सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालणाऱ्यांना शेवटी न्याय मिळतो, हे या निर्णयाने सिद्ध केले,” असे मत यावेळी मांडण्यात आले.
आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, केजरीवाल यांच्या या ऐतिहासिक लढ्यात सावनेर येथील कार्यकर्ते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे होते. जनतेच्या मनात स्वच्छ, पारदर्शक आणि जनाभिमुख राजकारणाची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सावनेर येथील कार्यकर्त्यांनकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले.
मागील काही निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सावनेर येथील आम आदमी पार्टीच्या कार्याची जोरदार चर्चा झाली असून, पक्षाची कामगिरी राज्यभर गाजली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राष्ट्रीय नेतृत्वात तसेच स्थानिक पातळीवर पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सावनेर व इतर तालुक्यांमध्ये पक्षाला नवी ओळख मिळवून दिली आहे.
या ऐतिहासिक निर्णयानंतर सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.




