गिरीश आंदे
कळमेश्वर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीतर्फे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या निर्देशानुसार हंगाम २०२५-२०२६ मधील तूर खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत तूर खरेदी केली जाणार आहे.
शासकीय तूर खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी २४ फेब्रुवारी २०२६ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत नोंदणी न केल्यास खरेदी प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी आधारकार्डची झेरॉक्स प्रत, सन २०२५-२०२६ मधील तूर पीक नोंद असलेला ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधारकार्ड लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तसेच मोबाईल क्रमांक आवश्यक राहणार आहे. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
तूर स्वच्छ व योग्य प्रकारे वाळवूनच खरेदी केंद्रावर आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत ऑनलाईन नोंदणी करून अधिकाधिक तूर उत्पादक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबाराव कोढे, उपाध्यक्ष आशीष देशमुख तसेच संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




