गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील संपुर्ण अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी समजून तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांचे समाधान करावे, अन्यथा टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी दिला. कळमेश्वर तहसील कार्यालयात मंगळवारी दि.29 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजता समन्वय समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. पोतदार होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत आमदार आशिष देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, तालुका अध्यक्ष प्रमोद हत्ती, ईश्वर यावलकर, गजानन वाडोदे,धनराज देवके, दिलीप धोटे, मीना तायवाडे, संदीप उपाध्याय, बेबीताई धुर्वे, अजय वाटकर, प्रतीक कोल्हे, महादेव इखार, प्रकाश वरुडकर, दिलीप तायवाडे, वैभव टेकाडे, मंगेश चौरे, स्वप्नील चौधरी, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार विकास बिक्कड, ठाणेदार मनोज काळबांडे, नायब तहसीलदार ज्योती जाधव,संदीप तडसे व विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
या सभेत डॉ. पोतदार यांनी स्पष्टपणे निर्देश दिले की,संजय गांधी व श्रावणबाळ योजनेंतर्गत एकही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू नये. यासाठी मंडळ व गाव पातळीवर लाभार्थ्यांच्या घरी जाऊन डीबीटी प्रक्रिया पूर्ण करावी. आढावा बैठकीत सर्वाधिक तक्रारी भूमी अभिलेख कार्यालय संदर्भात होत्या. यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. रेल्वे पुलाखालील खड्डा,जो आसरा माता मंदिराजवळ आहे, यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांना तो खड्डा तात्काळ भरून काढण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी आ. आशिष देशमुख यांनी अधिकाऱ्यांनी ‘राईट टू सर्व्हिस’ कायद्याचे पालन करावे व उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येईल,असे आश्वासन दिले. तर भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या बैठकीत कळमेश्वर तालुक्यातील अनेक नागरिकांनी तक्रारीसाठी उपस्थिती दर्शवली होती. सभेचे संचालन मंगेश ढवळे यांनी केले.
Home Breaking News डॉ राजीव पोतदार यांच्या अध्यक्षतेत कळमेश्वर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची...




