Home समस्या भागीमारी टोलनाक्यावर हेल्मेट कारवाईचा ‘अतिउत्साह’ – हेटी चौकीच्या पोलिसांकडून वाहनधारकांची कोंडी!

भागीमारी टोलनाक्यावर हेल्मेट कारवाईचा ‘अतिउत्साह’ – हेटी चौकीच्या पोलिसांकडून वाहनधारकांची कोंडी!

2
0

सावनेर
स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी की केवळ चालानचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी? असा संतप्त सवाल सध्या पाटणसावंगी टोलनाका परिसरातून उपस्थित केला जात आहे. पाटणसावंगी येथील हेटी पोलीस चौकीचे अंमलदार अमोल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टोलनाक्याजवळ लावलेल्या हेल्मेट तपासणीच्या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हेटी पोलीस चौकीच्या हद्दीत येणाऱ्या भागेमारी टोलनाक्याजवळ पोलीस अंमलदार अमोल वाघ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अचानक विना-हेल्मेट दुचाकी चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. टोलनाक्यावरून ये-जा करणाऱ्या ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना अडवून जागच्या जागीच दंडात्मक चालान फाडले जात आहे. पोलिसांचे शासकीय वाहन (एम एच १२ आरटी ९६२२) टोलनाक्याच्या बाजूला उभे करून ही कारवाई केली जात असल्याचे समोर आले आहे.
नागरिकांचा आरोप:-
“ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आणि लहान-सहान कामासाठी बाहेर पडणारे लोक या रस्त्यावरून प्रवास करतात. पोलीस मुख्य गुन्हेगारी किंवा वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी केवळ टोलनाक्यावर दबा धरून बसतात आणि गरिबांच्या खिशाला कात्री लावतात,” अशा भावना काही वाहनधारकांनी व्यक्त केल्या.
कारवाई की वसुलीचा अजेंडा?
टोलनाक्याजवळ अशा प्रकारे अचानक नाकाबंदी करून केवळ चालान फाडण्यावर भर दिल्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक नियमांचे पालन व्हावे ही चांगली गोष्ट असली, तरी ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात न घेता किंवा आधी जनजागृती न करता थेट दंडाचा बडगा उगारल्याने हेटी पोलिसांच्या या ‘अतिउत्साही’ कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी दखल घेऊन सामान्य वाहनधारकांना होणारा त्रास कमी करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here