गिरीश आंदे
धापेवाडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या घोराड, उबाळी परसोडी व. पिपळा कि. धापेवाडा या गावांमधील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अंगणवाडी येथील बंद पडलेले सोलर प्रकल्प सुरू करण्यात यावेत या मागणीसाठी प्रिया रमेश मानकर यांनी नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री.विनायकजी महामुनी यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की शासनाच्या महत्त्वकांशी योजनेअंतर्गत उभारलेले हे प्रकल्प देखभाल आणि दुरुस्ती अभावी बंद पडले असून त्यामुळे वीजपुरवठ्या अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काम आरोग्य सेवा तसेच अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात या समस्येची तीव्रता अधिक जाणवत आहे.
सदर बंद सोलर प्रकल्पाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी तसेच सर्व प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी प्रिया रमेश मानकर यांनी या निवेदनातून केली आहे.
ग्रामीण भागातील शाळा आरोग्य केंद्र व अंगणवाडींना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने या विषयाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा प्रिया रमेश मानकर यांनी व्यक्त केली.




