गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील मौजा दुधबर्डी येथील सर्वे क्रमांक 31/2 या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया केंद्र व बायोगॅस प्रकल्पातील विष्ठा गाळ प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
दि. 15 मार्च 2026 रोजी सायंकाळी ग्रामपंचायत सोनोली (दुधबर्डी) कडून दवंडी देण्यात आल्यानंतर सोनाली गावातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रकल्पामुळे भविष्यात भु, जल आणि वायू प्रदूषण वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेती, पर्यावरण आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मौजा दुधबर्डी येथील प्रस्तावित ठिकाणाजवळ सावंगी परदेशी, सोनोली (नाईक) आणि परसोडी (वकील) ही गावे असून प्रकल्पामुळे आसपासच्या गावांनाही दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विष्ठा गाळाची योग्य प्रकारे प्रक्रिया न झाल्यास तीव्र दुर्गंधी, वायू प्रदूषण आणि रोगकारक जीवाणूंचा प्रसार होण्याचा धोका असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. तसेच गाळातील रसायने भूजलात मिसळल्यास पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता आहे.
या परिसरात शेतकऱ्यांची बागायती शेती असून प्रकल्पामुळे मातीची सुपीकता कमी होणे, शेतीचे नुकसान आणि मालमत्तेचे मूल्य कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे हा प्रकल्प येथे उभारू नये, अशी मागणी करत ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन प्रकल्पाला नकार देण्याची मागणी केली आहे.




