Home उद्योग नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ‘गोदाम लॉजिस्टिक्स पार्क’चा भव्य...

नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ‘गोदाम लॉजिस्टिक्स पार्क’चा भव्य शुभारंभ – नागपूर बनणार देशाचे ‘लॉजिस्टिक्स कॅपिटल’!

2
0

गिरीश आंदे
राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी चालना देणाऱ्या अत्याधुनिक ‘गोदाम लॉजिस्टिक्स पार्क’चा भव्य शुभारंभ आणि कोनशिला अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूरमध्ये उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक स्वरूपाचे लॉजिस्टिक्स पार्क महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देणारे ठरेल. जागतिक भू-राजकीय परिस्थितीत भारतासमोर उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली असून, जागतिक पुरवठा साखळीत भारताची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी लॉजिस्टिक्स क्षेत्र सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ‘पीएम गती शक्ती योजना’ ही देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारी राष्ट्रीय मास्टर प्लॅन योजना असून, या माध्यमातून रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, जलमार्ग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांना एकात्मिक पद्धतीने जोडले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या या योजनेशी सुसंगत राहून महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र लॉजिस्टिक्स धोरण तयार केले असून, महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य उत्पादन आणि लॉजिस्टिक्स केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली या औद्योगिक केंद्रांना समृद्धी महामार्ग, रेल्वे, ड्राय पोर्ट, बहुविध वाहतूक लॉजिस्टिक्स पार्क आणि मालवाहतूक मार्गिकांद्वारे जोडण्यावर भर दिला जात आहे.
विशेषतः नागपूरला देशाचे प्रमुख लॉजिस्टिक्स कॅपिटल म्हणून विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योजकांनीही महाराष्ट्र सरकारच्या धोरणाला साथ देत ‘गोदाम लॉजिस्टिक्स पार्क’सारखे प्रकल्प उभारल्यामुळे हा उपक्रम उत्पादन आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके तसेच गोदाम लॉजिस्टिक पार्कचे संचालक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, केदारनाथ गुप्ता आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here