Home जागरुकता मतदार पुनरीक्षणासाठी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे आवाहन

मतदार पुनरीक्षणासाठी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे आवाहन

26
0

गिरीश आंदे
पात्र असलेल्या प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत आले पाहिजे. मतदान करणे हा प्रत्येक पात्र मतदाराचा अधिकार असून कोणीही यापासून वंचित राहू नये यादृष्टीने सखोल मतदार पुनरीक्षणाची मोहीम निवडणूक विभागाने हाती घेतली आहे. यात पात्र असलेल्या कोणत्याही मतदाराचे नाव वगळले जाणार नाही. जी नावे चुकीची आहेत त्यांना यात दुरुस्तीची संधी मिळावी, नवीन मतदार नोंदणी व्हावी व आहे त्या मतदार यादीतील नावे पडताळून घेता यावीत असा या मोहिमेचा उद्देश आहे. मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओंना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केले.
मतदारांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना व्हावी याउद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागाच्या तुलनेत सद्यस्थितीत शहरातील मतदारांची पडताळणीचे प्रमाण वाढावे यासाठी निवडणूक विभाग प्रयत्न करीत आहे. या कामासाठी घरोघरी जाऊन बीएलओ पडताळणी करीत आहेत. आपल्या भागात येणाऱ्या बीएलओंना नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केली.
ही सखोल पुनरीक्षण मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे पूर्ण व्हावी यादृष्टीने जिल्हा प्रशासन दक्ष आहे. प्रत्येक मतदार संघनिहाय बीएलओंची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची यादी पारदर्शकतेच्या दृष्टीने संबंधितांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्यांच्या काही अडचणी असतील अथवा कुणाच्या पडताळणीबाबत शंका असतील तर प्रांत अधिकाऱ्यांकडे त्या सोडविता येतील. आधार व इतर निकषाप्रमाणे मतदार नोंदणी चुकीची असल्याचे निदर्शनास आले तर त्याबाबत प्रांत अधिकाऱ्यांकडे याबाबत सुनावणी होईल. शिवाय प्रत्येक मतदार संघात याबाबत स्वतत्र पडताळणी शिबीरे आयोजित करण्यात येत असून जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रक्रिया सामुहिक जबाबदारीतून पूर्ण होणारी असल्याने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यात आपला सहभाग देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here