Home जागरुकता उपविभागीय अधिकाऱ्यांचा कळमेश्वर तालुक्यातील कृषी केंद्रांवर अचानक दौरा – खत साठ्याची काटेकोर...

उपविभागीय अधिकाऱ्यांचा कळमेश्वर तालुक्यातील कृषी केंद्रांवर अचानक दौरा – खत साठ्याची काटेकोर तपासणी

24
0

गिरीश आंदे
दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सावनेर उपविभागीय अधिकारी कुश मोटवानी (भा.प.से), तहसीलदार कळमेश्वर विकास बिक्कड, तालुका कृषी अधिकारी दिपाली कुंभार आणि तालुका गुणनियंत्रण निरीक्षक प्रशांत राऊत यांनी आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची संयुक्त तपासणी मोहीम राबवली.
या तपासणीदरम्यान युरिया, डीएपी तसेच इतर अनुदानित रासायनिक खतांचा प्रत्यक्ष साठा, नोंदीतील साठा आणि ई-पॉस मशीनमधील विक्री नोंदी यांची सविस्तर पडताळणी करण्यात आली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात वेळेवर व पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तपासणीदरम्यान कोणत्याही कृषी सेवा केंद्रात अनियमित साठा, अतिरिक्त साठवणूक किंवा अनुदानित खतांची अवैध विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर व गंभीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश उपविभागीय अधिकारी कुश मोटवानी यांनी कृषी विभागाला दिले.
तसेच ही तपासणी मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून, आठवड्यातून एक ते दोन वेळा अचानक संयुक्त तपासणी दौरे करण्यात येतील, असेही तहसीलदार कळमेश्वर यांच्याकडून सूचित करण्यात आले.
या कारवाईमुळे खरीप हंगामात खत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here