गिरीश आंदे
कृषी उत्पन्न बाजार समिती,कळमेश्वर यांच्या वतीने धापेवाडा येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी आयोजित शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रमात माजी मंत्री सुनील केदार आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी धोरणांवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत त्यांनी कृषी क्षेत्रातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याचे सांगितले. बियाणे, खते, औषधे, वीज आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना शेतमालाला त्यानुसार भाव मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी अडचणीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खासदार श्यामकुमार बर्वे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत विविध प्रश्नांवर चर्चा केली. तर माजी मंत्री सुनील केदार यांनी शेतकऱ्यांनी संघटितपणे पुढे येण्याची गरज व्यक्त करत कृषी क्षेत्राला सक्षम करण्यासाठी व्यापक धोरणात्मक बदलांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय, बाजारपेठेतील बदलते प्रवाह आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून कृषी क्षेत्रातील नव्या संधींबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबा पाटील, उपसभापती प्रतिभाताई पालटकर, संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तसेच खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबा कोढे, उपाध्यक्ष आशिष देशमुख व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमास मुक्ता कोकड्डे, पिंकी कौरती,वैभव घोंगे, श्रावण भिंगारे, माधव चर्जन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी क्षेत्रातील जाणकार आणि नागरिकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.



