Home कृषी कळमेश्वर एमआयडीसीमध्ये केमिकल्स कंपनीवर कृषि विभागाची धाड – अनुदानित युरियाच्या १०० बॅगा...

कळमेश्वर एमआयडीसीमध्ये केमिकल्स कंपनीवर कृषि विभागाची धाड – अनुदानित युरियाच्या १०० बॅगा जप्त

67
0

गिरीश आंदे
शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या कळमेश्वर येथील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल्स कंपनीवर कृषि विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत शासकीय अनुदानित युरिया खताचा औद्योगिक वापर केल्याचे उघड झाले असून १०० पेक्षा जास्त बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत.
दि.१२ मार्च २०२६ रोजी आसिफ सलाट (वय ५२) यांच्या मालकीच्या एशियन केमिकल्स प्रा. लि. या कंपनीवर कृषि विभागाच्या गुण नियंत्रण शाखेच्या पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान या कंपनीत तयार होणाऱ्या मेलामाईन आणि रेझिन उत्पादनासाठी शासकीय अनुदानित युरियाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले.
केंद्र शासनाकडून अनुदानित असलेला युरिया खत केवळ शेतीसाठीच वापरणे बंधनकारक असून तो परवानाधारक कृषि सेवा केंद्रांमार्फत ई-पॉस मशीनद्वारे शेतकऱ्यांना विक्री करण्याची व्यवस्था आहे. मात्र या कंपनीत औद्योगिक वापरासाठी युरियाच्या १०० पेक्षा अधिक बॅगांचा साठा करण्यात आल्याचे तसेच त्याचा वापर बॉयलरमध्ये सुरू असल्याचे भरारी पथकाने पाहिले.
कारवाईदरम्यान पथकाने युरियाच्या बॅगा तसेच रिकामी पोती जप्त केली. जप्त केलेल्या युरियाचे नमुने तपासणीसाठी खत निरीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्याचे निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक सुनिल बोरकर, विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी समाधान धूळधुळे, जिल्हा कृषि अधिकारी रवींद्र राठोड, तालुका कृषि अधिकारी दिपाली कुंभार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाईत तसेच तालुका निरीक्षक प्रशांत राऊत,ऐश्वर्या सहारे आणि ओमप्रकाश गहूकर यांनी सहभाग घेतला.
ही धाड कळमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मन्नान औरंगाबादे यांच्या उपस्थितीत पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here