कळमेश्वर तालुक्यातील मातोश्री वृद्धाश्रम आदासा येथे सोनपुर आदासा गट ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा उत्साही वातावरणात पार पडली. ग्रामपंचायत कार्यालयासाठी योग्य ठिकाण निवडण्यासाठी दोन पर्यायावर महत्त्वपूर्ण गुप्त मतदान घेण्यात आले.या ग्रामसभेला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी,तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी आणि कडक पोलीस बंदोबस्त होता. ग्रामपंचायत कार्यालय बांधणीसाठी
१. वॉर्ड क्रमांक १,आदासा येथील आरोग्य केंद्राजवळील
२. सोनपुर आदासा बस स्टॉपजवळील जनसुविधा केंद्राशेजारील
या दोन जागांपैकी एकाची निवड करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये गुप्त मतदान घेण्यात आले.एकुण ७७५ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी सोनपुर स्थळासाठी ४८५मते, तर आदासा स्थळासाठी २९० मते मिळाली. सोनपुर आदासा बस स्टॉपजवळील जागेला १९५ मतांनी आघाडी मिळाली.या निर्णयामुळे ग्रामपंचायत कार्यालय आता सोनपुर आदासा बस स्टॉपजवळील जनसुविधा केंद्र शेजारी उभारण्यात येणार असून अनेक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.




