Home Breaking News निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल – महसूल मंत्री चंद्रशेखर...

निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

71
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
मागील पन्नास वर्षांत कधीही न घडलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन सर्वतोपरी मदतीस कटिबद्ध असून, गरज भासल्यास निकष बाजूला ठेवूनही मदत करण्यात येईल, असे स्पष्ट प्रतिपादन महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
ते कळमेश्वर तालुक्यातील मौजा दाढेरा, तेलकामठी, तिडंगी, तेलगाव, नांदा गोमुख आदी गावांतील शेती क्षेत्राच्या पाहणीदरम्यान बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे यांनी संत्रा,सोयाबीन, कापूस, तूर व वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान स्वतः पाहिले आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन धीर दिला.
त्यांनी सांगितले की,राज्यात ऑगस्ट अखेरपर्यंत सुमारे 25 लाख हेक्टर आणि सप्टेंबरमध्ये आणखी 22 लाख हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. संपूर्ण महसूल यंत्रणा शेताच्या बांधावर असून, येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्याच्या माध्यमातून नुकसानीची आकडेवारी तयार केली जाणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.
पंचनामे करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश महसूल विभागाला देण्यात आले आहेत. तसेच, पंचनाम्यात चूक झाल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य दुरुस्ती केली जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ड्रोनच्या सहाय्याने तसेच प्रत्यक्ष पाहणीद्वारे पंचनामे करून मदत वितरण अधिक पारदर्शक व परिणामकारक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.
शहरांमध्ये सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर उपाय म्हणून शहरांमध्ये जल व मलनिस्सारणाचे नियोजन आणि ग्रामीण भागात जलसंधारणाच्या उपाययोजनांवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here