सावनेर प्रतिनिधी
दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सावनेर शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या प्रकरणावरून आज जनजागृतीचे पाऊल उचलण्यात आले. हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड यांनी नियमांचे उल्लंघन करून टू व्हीलर (ॲक्टिवा) गाडी क्रमांक MH-40 BY-2912 चालवणाऱ्या १६ वर्षीय दोन विद्यार्थ्यांना थांबवून चौकशी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे विद्यार्थी सारस्वत स्कूल सावनेर येथील असल्याचे समजते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावनेर पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुकुल ट्युशन क्लासेस येथे भेट देऊन लहान मुलांना वाहन न चालविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना व पालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि अल्पवयीन असताना वाहन चालवू न देण्याचे आवाहन केले.
सदर उपक्रमाद्वारे शहरात सुरक्षित वाहतूक संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती सावनेर पोलिसांकडून व हितेश बनसोड यांच्या कडून देण्यात आली आहे.




