मौदा (तालुका प्रतिनिधी)
नगरपंचायत मौदा येथे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूर येथील नितीन व्यवहारे यांनी मंगळवारी (१८ नोव्हेंबर २०२५) मतदान केंद्रे, स्ट्राँग रूम तसेच निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.
निवडणूक निरीक्षक व्यवहारे यांनी नगरपंचायत हद्दीतील सर्व मतदारसंघांच्या मतदान केंद्रांची (बूथ) प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, रॅम्पसह दिव्यांगांसाठी प्रवेशयोग्यता, वीज पुरवठा, सीसीटीव्ही कव्हरेज, सुरक्षा बंदोबस्त आदी मूलभूत सुविधांची पडताळणी केली. तसेच मतदान कक्षाची रचना, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट साठवणूक, स्ट्राँग रूमची २४×७ सीसीटीव्ही निगराणी व सुरक्षा सीलिंग प्रक्रिया तपासून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आगामी मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेताना काउंटिंग हॉलमधील टेबल मांडणी, सुरक्षा व्यवस्था, उमेदवार-एजंट्ससाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली याबाबतही मार्गदर्शन केले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज यशस्वीरीत्या पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निरीक्षक नितीन व्यवहारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विवेक मेश्राम, इच्छुक उमेदवार व त्यांचे सूचक उपस्थित होते.
छाननी प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर व्यवहारे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, शांततापूर्ण व नियमानुसार सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी निर्धारित वेळेत नगरपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. पुढील सर्व निवडणूक टप्पे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे राबविले जातील, असे निवडणूक निर्णय अधिकारी निंबाळकर यांनी सांगितले.
Home Breaking News नगरपंचायत मौदा सार्वत्रिक निवडणूक २०२५ : निरीक्षक नितीन व्यवहारे यांची मतदान केंद्रे...




