Home जागरुकता मौदा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा ! ग्राहक चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप...

मौदा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा ! ग्राहक चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप द्या – तहसीलदार निंबाळकर यांचे आवाहन

45
0

मौदा (तालुका प्रतिनिधी)
येथील तहसील अन्नपुरवठा विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचांच्या वतीने ग्राहक हक्कांची जागृती व्हावी यासाठी दि.२४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन मौदा तहसीलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर होते. त्यांनी मार्गदर्शन करताना ग्राहक चळवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता सतत चालू असलेल्या जनआंदोलनात रूपांतरित करण्याचे आवाहन केले.
“ग्राहक दिवस साजरा करून थांबू नका, चळवळीत रूपांतर करा” असे प्रेरणादायी उद्गार तहसीलदार निंबाळकर यांनी काढले. त्यांनी ग्राहकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये स्पष्ट करताना सुरक्षा, माहिती, निवड, ऐकले जाणे, नुकसानभरपाई आणि शिक्षण असे सहा मूलभूत हक्क असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार योगीता दराडे,अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष दिनेश ढोबळे, उपाध्यक्ष दिगांबर बांगडकर, महिला प्रमुख शीला तुरनकर, मार्गदर्शक डॉ. निलिमा घाटोळे, रेशमा निकम, मनीष काळे, रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष अशोक वासनिक आणि तुकाराम लुटे आदिंनी ग्राहक जागृतीबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तहसीलमधील अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्न पुरवठा निरीक्षक शालिनी बारस्कर यांनी केले, तर आभार अमोल देशपांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम तिजारे, प्रशांत उमरडकर आणि आरती मस्के यांचे विशेष सहकार्य लाभले. हा कार्यक्रम ग्राहक हक्क जागृतीचा प्रभावी व्यासपीठ ठरला असून, मौदा तालुक्यात ग्राहक चळवळीला आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here