गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर पोलीस हद्यीतील सावंगी (मोहगाव) शिवारात सात दिवसांच्या आत दुसरी खुनाची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कौटुंबिक वादातून अल्पवयीन पुतण्याने सख्ख्या काकाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 22 डिसेंबर 2025) दुपारी उघडकीस आली.
मृत व्यक्तीचे नाव राजू दिंगाबर मानकर (वय 45) असे असून ते शेतीकामासाठी सकाळी घरातून बाहेर पडले होते. वडीलोपार्जित शेतीतील पाण्याच्या पाइपलाइनवरून राजू मानकर आणि त्यांचा भाऊ सुनिल मानकर यांच्या कुटुंबात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वाद सुरू होते. याच वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास राजू मानकर यांच्या पत्नीला शेजारील गावातील व्यक्तीकडून फोन येऊन “मामी, मामाला मारले आहे, ताबडतोब या,” अशी माहिती देण्यात आली. घटनास्थळी धाव घेत असताना त्यांना अल्पवयीन पुतण्या कार्तीक सुनिल मानकर (वय 15) हातात कुऱ्हाड घेऊन जाताना दिसला. सावंगी–पिपळा रोडलगत असलेल्या शेताजवळ पोहोचल्यावर राजू मानकर यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाइपलाइनवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातूनच अल्पवयीन कार्तीक मानकर याने काकावर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. कळमेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अल्पवयीन असल्याने पुढील कारवाई किशोर न्याय कायद्यानुसार केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात 15 डिसेंबर रोजी मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची घटना घडली होती. त्या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच अवघ्या सातव्या दिवशी पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडल्याने सावंगी (मोहगाव) व परिसरातील नागरिक हादरून गेले आहेत.
सलग दोन खुनांच्या घटनांमुळे कौटुंबिक वाद, शेतीतील पाण्यावरून होणारे तणाव आणि अल्पवयीनांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.




