मौदा (तालुका प्रतिनिधी)
मौदा तालुका आता वाघाच्या थरकाप उडवणाऱ्या दहशतीखाली आहे. गेल्या ४८ तासांत तब्बल चार जनावरांचा बळी घेत पट्टेदार वाघाने संपूर्ण परिसर हादरवून सोडला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत, मजूर शेतावर जाण्यास घाबरतायत आणि रात्री गावाच्या रस्त्यावरही लोक फिरकत नाहीत.
१० डिसेंबरला रात्री परमात्मा एक आश्रमाजवळील देवराव धनजोडे यांच्या गोठ्यातील दोन जनावरे वाघाने ठार केली. दुसऱ्या रात्री म्हणजे ११ डिसेंबरला त्याने धडक दिली माथनी आणि भामेवाडा परिसरात.माथनी येथील शेतकरी तुकाराम इखार यांच्या शेतात बांधलेली गाय वाघाने फस्त केली. त्याच परिसरात पंडित मुराडे यांचे एक वासरूही वाघाच्या तडाख्यातून वाचले नाही.
आता तर वाघ गावातच येऊ लागलाय! मौद्यातील बाभरे पेट्रोलपंप आणि ज्ञानगंगा कॉन्व्हेंट जवळील लापका रोडवर मंगळवारी रात्री मोठा पट्टेदार वाघ चालताना दिसला. लोकांनी मोबाईलमध्ये कैद केलेले त्याचे फोटो-वीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रस्त्यावरून आरामात फिरणारा हा वाघ पाहून गावकरी थरथर कापतायत. त्याचप्रमाणें पटाच्या दाण नर्सरी कडे मोठ्या वाघाचे पदचिन्ह (यायाचे ठसे) आढळून आले आहेत.
“आम्ही रात्री घराबाहेर पडायला घाबरतोय. जनावरे तर सोडाच, आता आमच्याही जीवाला धोका निर्माण झाला अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. मजूरही आता म्हणतायत, “वाघ फिरतोय त्या शेतात आम्ही कामाला जाणार नाही.” परिणामी शेतातील कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे.
वनविभाग कुठे आहे?
सततच्या हल्ल्यांनंतरही वनविभागाकडून फक्त “पिंजरा लावतोय, ट्रॅप कॅमेरा लावतोय” अशी औपचारिक उत्तरे येतायत. प्रत्यक्षात मात्र वाघ मोकाट फिरतोय आणि जनावरे मारतोय. गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आमची जनावरे आणि जीव धोक्यात घालून आम्ही जगायचं कसं?” असा संतप्त सवाल ते विचारतायत.
मौदा तालुका आता वाघ आणि बिबट्यांच्या दहशतीखाली पूर्ण वेढलेला आहे. रात्रीचा अंधार आला की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच भीती “आज रात्री माझ्या गोठ्याची पाळी तर नाही ना?” ही बातमी फक्त जनावरांच्या मृत्यूची नाही… तर ही बातमी आहे एका संपूर्ण तालुक्याच्या झोप उडालेल्या रात्रींची!
Home कृषी मौदा तालुक्यात वाघाचा खुला दहशतवाद! रात्रीच्या अंधारात शेतात बांधलेली जनावरे फस्त करतोय...



