सावनेर तालुका प्रतिनिधी
दि.18 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय एकात्मतेस दृढ करण्याच्या उद्देशाने डॉ. अभिविलास नखाते यांच्या संकल्पनेतून महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघाच्या वतीने आयोजित विदर्भ स्तरीय महासम्राट बळीराजा रथयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज शिवतीर्थ टुरिझम उमरी ता.सावनेर जि.नागपुर येथून सकाळी 7 वाजता औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
या रथयात्रेचा उद्देश विदर्भातील समाजघटकांमध्ये ऐक्य,सद्भाव व कृषिसंस्कृतीचा गौरव वृद्धिंगत करणे हा आहे. यानिमित्ताने विविध जिल्ह्यांतील नागरिक, शेतकरी बांधव आणि संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.रथयात्रेचा दुसरा टप्पा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार मार्गक्रमण करीत आहे.
दि.18 ऑक्टोबर रोजी सावनेर येथून प्रारंभ होऊन कोराडी, बाजारगाव, उमरेड, भिवापूर, नीलज, नागभीड, ब्रम्हपुरी, आरमोरी, वडसा आणि लाखांदूर मार्गे ही यात्रा अर्जुनी मोर येथे मुक्कामी पोहोचेल.
दि.19 ऑक्टोबर रोजी नवेगाव बांध येथून पुढे सुरु होऊन सडक अर्जुनी, गोरेगाव, गोंदिया शहर, तिरोडा, बिरसी फाटा, देव्हाडा, खापा (चौक), मोहाडी, वरठी मार्गे ही यात्रा भंडारा शहरात पोहोचेल व तेथे मुक्कामी राहील.
दि.20 ऑक्टोबर रोजी रथयात्रा शहापूर (पेठ पं.), मौदा, बापदेव, रामटेक, मनसर, कन्हान आणि पारशिवणीमार्गे प्रवास करून खापा येथे आगमन करेल. यानंतर सायंकाळी खापा येथे महासम्राट बळीराजा रथयात्रेचा समारोप समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
या भव्य रथयात्रेमधून राष्ट्रसेवा, सामाजिक ऐक्य व कृषिप्रधान संस्कृतीचे मूल्य अधोरेखित केले जात असून, विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सद्भावना आणि एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचे कार्य या उपक्रमातून साधले जात आहे.
Home Breaking News शिवतीर्थ टुरिझम येथून विदर्भ स्तरीय महासम्राट बळीराजा रथयात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ




