Home कृषी महिला बचत गटांना ‘कृषी औजारे बँक’ योजनेतून २४ लाखांपर्यंत अनुदान – दीपाली...

महिला बचत गटांना ‘कृषी औजारे बँक’ योजनेतून २४ लाखांपर्यंत अनुदान – दीपाली कुंभार (तालुका कृषी अधिकारी, कळमेश्वर)

2
0

गिरीश आंदे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत कळमेश्वर तालुक्यातील ३२ गावांमध्ये कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘कृषी औजारे बँक’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे नोंदणीकृत महिला बचत गटांना प्रकल्प मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत, कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली कुंभार यांनी दिली.
या योजनेचा मुख्य उद्देश अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंत आधुनिक यंत्रसामग्री माफक दरात उपलब्ध करून देणे हा आहे. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित यंत्रे, पेरणी यंत्रे, बीबीएफ यंत्र तसेच काढणीनंतरची प्रक्रिया करणारी यंत्रे यांचा समावेश आहे.
‘उमेद’ (एमएसआरएलएम) किंवा ‘माविम’ (एमएसव्हीआयएम) अंतर्गत नोंदणीकृत किमान १० सदस्य असलेले महिला बचत गट या योजनेसाठी पात्र आहेत. ही योजना फक्त पोकरा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या गावांसाठी लागू आहे.
इच्छुक बचत गटांनी ‘एफपीओ-डीबीटी पोर्टल’वर किंवा ‘महाविस्तार’ मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. एकाच गावातून एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास लाभार्थ्यांची निवड पारदर्शक ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल.
या योजनेत झिल्पी, लोहगड, देवळी, बुधला, पिल्कापार, मांडवी, जिरोला, खुमारी, म्हसेपठार, खुर्सापार, रामगिरी, पारडी (देशमुख), खैरी (देशमुख), सुसुन्द्री, सवंद्री, येल्कापार, कोहळी, सोनोली, वाठोडा, मोहळी, सिंदी, पिपळा (किनखेडे), मोहगाव, सावंगी, वाढोणा (खु), सोनापार, सावळी (खु), खापरी (उमा), कारली, आलेसूर, गोंडखैरी आणि चिंचभवन या ३२ गावांचा समावेश आहे.
कृषी विभागाने ग्रामीण भागातील महिलांनी संघटित होऊन आधुनिक शेतीकडे वळावे व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here