Home सांस्कृतिक व सामाजिक सी-प्लेन सेवा ही खऱ्या अर्थाने रामटेकच्या विकासामध्ये एक महत्वाचा पाऊल – राज्यमंत्री...

सी-प्लेन सेवा ही खऱ्या अर्थाने रामटेकच्या विकासामध्ये एक महत्वाचा पाऊल – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

8
0

राजु कापसे रामटेक
विदर्भातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या खिंडसी जलाशयाच्या सौंदर्यात आता आधुनिकतेची भर पडणार आहे. केंद्र सरकारच्या ‘उडाण’ (UDAN) योजनेच्या धर्तीवर खिंडसी येथे बहुप्रतीक्षित ‘सी-प्लेन’ (Seaplane) सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच या प्रकल्पाचे मुख्य ऑपरेटर असलेल्या मेरीटाईम एनर्जी हेली एअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ‘मेहेर’ (एमइएचएस आयआर) कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खिंडसी बॅकवॉटर क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली असून, तांत्रिक व्यवहार्यतेची पडताळणी सर्वेक्षण दि.२९ मार्च २०२६ रोजी केले.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा…
विशेष म्हणजे, खिंडसी येथे सी-प्लेन सेवा सुरू व्हावी यासाठी स्थानिक आमदार आशिष जयस्वाल हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. २०१४ मध्ये त्यांनी सर्वप्रथम या क्रांतिकारी प्रकल्पाचा प्रस्ताव मांडून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. तत्कालीन तांत्रिक अडचणी आणि धोरणात्मक बदलांमुळे हा प्रकल्प काहीसा लांबणीवर पडला होता. मात्र, आता केंद्र व राज्य सरकारच्या ‘सुधारित उडाण’ धोरणामुळे जयस्वाल यांच्या २०१४ च्या या संकल्पनेला अखेर मूर्त रूप मिळताना दिसत आहे.
पाहणी दरम्यान राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि ‘मेहेर’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वॉटर एरोड्रोमसाठी आवश्यक असलेल्या ‘फ्लोटिंग जेटी’, प्रवाशांची सुरक्षा आणि टेक-ऑफसाठी उपलब्ध धावपट्टी (वॉटर रनवे ) यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, “हा प्रकल्प केवळ प्रवासाचे साधन नसून रामटेकच्या पर्यटनाला जागतिक नकाशावर नेणारा मैलाचा दगड ठरेल.ही सेवा सुरू करावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,स्व.अजित दादा पवार यांनी केलेल्या सहकार्याचा विनम्र उल्लेख केला तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (MADC) उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक (Vice Chairman and Managing Director – VCMD) स्वाती पांडे यांनी देखील या सर्व कामांसाठी सहकार्य केले.या सर्वांना त्यांनी धन्यवाद देत आभार मानले.
“यासोबतच रामटेक येथील चित्रनगरी आगामी काळात होणारा रोपवे कालिदास सृष्टी व राम सृष्टी ही कामेही निश्चितपणे होतील त्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मेहेर कंपनीचे सिद्धार्थ वर्मा, मोहम्मद शफीक, लेफ्टनंट कमांडर धनंजय शिरसाठ हे उपस्थित होते.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
खिंडसी येथून नागपूर विमानतळ, ताडोबा (इरई धरण), अमरावती आणि शेगाव यांसारखी ठिकाणे थेट हवाई मार्गाने जोडली जातील. उडाण योजनेच्या ‘व्हिजीएफ’ अनुदानामुळे प्रवाशांना साधारणतः २,००० रुपये मध्ये हवाई प्रवासाचा आनंद घेता येईल.या सेवेमुळे रामटेक गडमंदिर,पेंच व्याघ्र प्रकल्प आणि खिंडसी वॉटर स्पोर्ट्ससाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भाचे नवे पर्यटन केंद्र-
खिंडसी येथे वॉटर एरोड्रोम आणि अत्याधुनिक वेटिंग लाउंज उभारण्याचे नियोजन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एम एडीसी) केले आहे. सुरुवातीला ९-आसनी विमाने चालवली जातील, ज्याचा विस्तार भविष्यात १९-आसनी विमानांपर्यंत केला जाईल. ‘मेहेर’ कंपनीने यापूर्वी मुंबई-शिर्डी मार्गावर यशस्वी सेवा दिली असून, आता खिंडसी हे विदर्भातील सी-प्लेनचे मुख्य केंद्र बनणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलच, शिवाय विदर्भातील दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here