गिरीश आंदे
रामनवमीच्या पावन पर्वावर सावनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरती सोहळ्याने जागतिक स्तरावर नवा इतिहास रचला. नगर परिषद मैदानावर रात्री ८ वाजता हजारो दिव्यांच्या प्रकाशात तब्बल ४,९११ नागरिकांनी एकाच वेळी महाआरती करत विश्वविक्रम प्रस्थापित केला. या अभूतपूर्व उपक्रमाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शेतकरी कर्जमाफीबद्दल विशेष सत्कारही करण्यात आला. या वेळी त्यांनी सांगितले की, “जगभर युद्ध आणि अस्थिरतेचे वातावरण असताना सावनेरमध्ये हजारो नागरिकांनी एकत्र येऊन शांततेसाठी प्रार्थना करणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने जगात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होईल.”
या सोहळ्याचे आयोजन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले होते. त्यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ विश्वविक्रमासाठी नव्हता, तर अंधारातून प्रकाशाकडे आणि संघर्षातून शांततेकडे वाटचाल करण्याचा सामूहिक संकल्प होता.
कार्यक्रमाला महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी मंत्री रणजित देशमुख, भाजप नेते डॉ. राजीव पोद्दार तसेच जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आधी अयोध्या येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झालेला विक्रम सावनेरने मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या यशामुळे सावनेर-कळमेश्वर क्षेत्रासह महाराष्ट्र आणि देशाची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर उंचावल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.




