Home दुर्घटना १४ वर्षीय अथर्वचे अपहरणानंतर निर्घृण खून – भरतवाडा शिवारात पुलाजवळ पोत्यात सापडले...

१४ वर्षीय अथर्वचे अपहरणानंतर निर्घृण खून – भरतवाडा शिवारात पुलाजवळ पोत्यात सापडले शव

16
0

गिरीश आंदे
नागपूर शहरातील गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय अथर्व दिलीप नन्नोरे या मुलाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा २ एप्रिल रोजी सायंकाळी हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान येथील हनुमान मंदिरातून निघालेल्या झाक्यांमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी तसेच स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच मागोवा लागला नाही.
दरम्यान, शनिवारी (४ एप्रिल) दिवसभर अथर्वच्या शोधासाठी परिसरात बंद पाळण्यात आला होता. नागरिकांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर सायंकाळी कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भरतवाडा शिवारातील पुलाजवळ एका पोत्यामध्ये बांधलेले शव आढळून आले. तपासाअंती ते अथर्वचेच असल्याचे स्पष्ट झाले.
या खुनाची क्रूरता पाहून नागरिक हादरले आहेत. अथर्वचे दोन्ही हात व पाय काळ्या पट्टीने बांधलेले होते, तसेच त्याचा चेहरा जळालेल्या अवस्थेत आढळून आला. यावरून खून अत्यंत निघृण पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, या निष्पाप मुलाचे अपहरण करून खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला, हे अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे. कळमेश्वर पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. नागरिकांकडून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here