गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तेलकामठी महसूल मंडळात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल तेलगाव,दाढेरा आणि तिडंगी या गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
पाहणीच्या वेळी सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख, उपविभागीय अधिकारी श्री. संपत खलाटे,कळमेश्वरचे तहसीलदार श्री. विकास बिक्कड, तालुका कृषी अधिकारी सौ. दीपाली कुंभार,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.राजीव पोतदार,भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे,तालुका अध्यक्ष प्रमोद हत्ती,तसेच शासनाचे विविध अधिकारी उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान प्रतिनिधींनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी पिकांची झालेली नासाडी, पाण्यात बुडालेल्या जमिनी, वीजपुरवठा खंडित होणे याबाबत चिंता व्यक्त केली.
या वेळी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले, “राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्यात येईल. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून नुकसानभरपाईचे प्रस्ताव तत्काळ पाठवले जातील. एकाही पात्र शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीच्या प्राथमिक नोंदी सुरू केल्या असून, लवकरच सर्व गावांमध्ये पंचनाम्यांचे काम पूर्ण होणार असल्याचे तहसीलदार बिक्कड यांनी सांगितले.
तालुक्यातील कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य दिले जाईल, असे कृषी अधिकारी दीपाली कुंभार यांनी नमूद केले.
या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासन व प्रशासनाबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली असून, मदतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Home Breaking News डॉ.आशिष देशमुख यांचे कळमेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी ; शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचं...




