गिरीश आंदे
नागपूर – नागपूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव “उडान” चे बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम दि. २० जानेवारी २०२६ रोजी स्मृती सभागृह, वनामती येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे अध्यक्षस्थानी होते, तर आयोजन समितीच्या प्रमुख उपस्थितीत कृषी उपसंचालक दत्तात्रय येळे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, बळीराम सातपुते, आणि ग्रीष्मा डेहणे यांचा समावेश होता.
समारोप कार्यक्रमात कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी नागपूर जिल्ह्यातील क्रीडा महोत्सव कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, वर्षातून एकदा अशा प्रकारे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व विकास, संघभावना, सुप्त गुणांचा शोध, तसेच शासनाच्या योजना आणि विद्यापीठाच्या तंत्रज्ञान प्रसाराला सहाय्य मिळते. या यशस्वी कार्यक्रमामुळे उडान महोत्सव येत्या वर्षी राज्यस्तरावर आयोजित करण्याचा विचार आहे.
बक्षीस वितरणात वैयक्तिक आणि सांघिक क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी, हॉलीबॉल, कॅरम, धाव स्पर्धा, रस्सीखेच यांसारखे विविध खेळ आणि उत्कृष्ट पथ संचलन केलेल्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महाविस्तार एआय एप मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कृषी आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात विविध एकल आणि समूह गायन, नृत्य,कविता वाचन यांचा सादरीकरण करण्यात आले. या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातील 400 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.
Home कृषी नागपूरमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव “उडान” आयोजित;कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचे...



