मौदा (तालुका प्रतिनिधी)
नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत आयोजित जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2026 दिनांक 19 व 20 जानेवारी 2026 रोजी WCL मैदान, चणकापूर, पंचायत समिती सावनेर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तेरा तालुक्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. एकूण 15 क्रीडा प्रकार व 6 सांस्कृतिक स्पर्धा प्रकार मोठ्या चुरशीने पार पडले. या स्पर्धांमध्ये कनिष्ठ मुली खो-खो गटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरव्हा, पंचायत समिती मौदा येथील संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सलग दुसऱ्यांदा जिल्हास्तरीय विजेतेपद व चषक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल गावाच्या सरपंच विनायक सहारे, उपसरपंच चांगो तिजारे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोशन ठोंबरे यांनी मुख्याध्यापिका सुवर्ण ठोंबरे, क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण नागरगोजे, बलवंत अतकरी व सर्व शिक्षकवृंदाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच बोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जुगलकिशोर बोरकर यांनी केंद्रस्तरीय स्पर्धेपासूनच विद्यार्थिनींना खो-खो खेळातील नियम, कौशल्य व डावपेच याबाबत सातत्याने मार्गदर्शन केल्याने या यशात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले.
या यशाबद्दल पंचायत समिती स्तरावरूनही गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे, विस्तार अधिकारी चामट व भक्तवरती यांनी शाळेचे व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चिरव्हा शाळेच्या या सलग विजयामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थिनींच्या क्रीडाक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




