मौदा (तालुका प्रतिनिधी )
रामटेक तालुक्यातील चोखाळा येथे दिव्य नारी सोशल फाउंडेशनच्या वतीने हनुमान मंदिराच्या पटांगणात मकर संक्रांतीनिमित्त भव्य हळदीकुंकू व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनच्या अध्यक्ष कामिनी हटवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या प्रसंगी विधवा महिलांचा सन्मान, लहान मुलांची बोरहाण, महिलांची वेशभूषा स्पर्धा तसेच बॉल गेम, बलून गेम, रस्सीखेच, निशाणा, तळ्यात मळ्यात, उखाणे स्पर्धा अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी ‘होम मिनिस्टर’ हा खेळ विशेष आकर्षण ठरला. विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना दिव्य नारी सोशल फाउंडेशनतर्फे बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात देशासाठी बलिदान दिलेल्या पोलीस निरीक्षक स्व. अविनाश साठवणे यांच्या पत्नी कुंदा साठवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अनेक जेष्ठ महिलांचा मान सन्मान करण्यात आला. लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमास गावातील सर्व समाजातील महिला, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व महिलांना हळदीकुंकू व तिळगुळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली निमकर यांनी केले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.




