Home समस्या कळमेश्वर वनविभाग ‘जबाबदारी झटकतंय’- महावितरणच्या कामामुळे नागरिक संतप्त

कळमेश्वर वनविभाग ‘जबाबदारी झटकतंय’- महावितरणच्या कामामुळे नागरिक संतप्त

64
0

गिरीश आंदे
सावनेर–तिष्टी मार्गे काटोल रोडवर महावितरणकडून नवीन वीजवाहिनी उभारणीसाठी करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीनंतर रस्त्यावर सर्वत्र फांद्यांचा सडा पडलेला असून, हा मार्ग अक्षरशः अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. मात्र, नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असतानाही संबंधित प्रशासन आणि वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
रस्त्याच्या दुतर्फा तसेच अनेक ठिकाणी थेट रस्त्यावरच झाडांच्या मोठमोठ्या फांद्या टाकून दिल्यामुळे दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः थंडीच्या दिवसांत पहाटे व रात्री धुके पडत असताना एखादी जीवघेणी दुर्घटना घडणे अटळ असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
या गंभीर प्रकारावर कळमेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मात्र जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत,
“वीजवाहिनीखालील झाडांच्या फांद्या तोडण्याचे अधिकार महावितरणला आहेत. वनविभाग झाडे तोडून देत नाही. याबाबत महावितरणला विचारा,” असे उत्तर दिले आहे.
मात्र, हा खुलासा नागरिकांना मान्य नाही. कारण वृक्षतोडीस परवानगी देणे, नियमांचे पालन होत आहे की नाही यावर नियंत्रण ठेवणे आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवणे हे वनविभागाचे कायदेशीर कर्तव्य आहे.
जर रस्त्यावर फांद्या पडून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर वनविभागाने पाहणी न करता डोळेझाक का केली, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
“महावितरण काम करते, पण ते बिनधास्त व बेजबाबदारपणे होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कोण?”
“अपघात झाल्यानंतर मृतदेह पडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असे संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
हा मार्ग शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि अवजड वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा असताना, कोणत्याही अधिकाऱ्याने प्रत्यक्ष पाहणी न करणे, फांद्या हटवण्यासाठी तातडीचे आदेश न देणे, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे आणि असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान,
• तातडीने रस्त्यावरील सर्व फांद्या हटवाव्यात
• वाहतूक सुरक्षित करावी
• जबाबदार अधिकारी व यंत्रणांवर कठोर कारवाई करावी
अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
जर या दुर्लक्षामुळे एखादी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी महावितरण, वनविभाग आणि संबंधित प्रशासनावरच निश्चित केली जाईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here