मौदा तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मौदा शहरातील बँकांमध्ये ग्राहकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, बँकांनी ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी, सावली आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मौदा च्या वतीने तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांना बुधवार दि. २२ एप्रिल रोजी निवेदन सादर करण्यात आले.
उन्हात उभ्या राहणाऱ्या ग्राहकांची व्यथा
मौदा शहरात बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा यांसारख्या इतर डझनभर प्रमुख बँका कार्यरत आहेत. या बँकांमध्ये दररोज शेकडो शेतकरी, कष्टकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी येतात. मात्र, अनेक बँकांकडे पुरेशी जागा नसल्याने ग्राहकांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. बँका विविध सेवांच्या नावाखाली ग्राहकांकडून शुल्क वसूल करतात, मात्र किमान सुविधा पुरवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्राहक पंचायतीने केला आहे.
निवेदनाद्वारे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
तात्पुरता मंडप: उन्हाळ्याचा काळ संपेपर्यंत बँकांच्या समोर ग्राहकांसाठी सावलीची व कापडी मंडपाची सोय करावी.
शुद्ध पेयजल: प्रत्येक बँकेत ग्राहकांसाठी थंड आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था असावी.
स्वच्छतागृहांची सोय: लांबून येणाऱ्या ग्राहकांसाठी, विशेषतः महिलांसाठी बँकांनी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
मदतनीस कक्ष: ग्रामीण भागातील निरक्षर ग्राहकांना फॉर्म भरण्यासाठी आणि तांत्रिक मदतीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी.
“बँका ग्राहकांच्या पैशांवर व्यवसाय करतात, परंतु त्याच ग्राहकांना उन्हात ताटकळत उभे राहणे दुर्दैवी आहे. तहसीलदारांनी या प्रकरणी बँक व्यवस्थापकांची तातडीने बैठक घेऊन त्यांना कडक निर्देश द्यावेत.” अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचांच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष दिनेश ढोबळे यांच्यासह सह सचिव ईश्वर पत्रे, महेंद्र चकोले, कोषाध्यक्ष डॉ. सुनील बोरकर, प्रसिद्धी प्रमुख संजय गिरडे, पर्यावरण आयाम प्रमुख गुलाब तुरणकर, नागपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य देवेंद्र सोनटक्के, विदर्भ प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे, डॉ. रेवाराम घाटोळे, कैलास मेश्राम व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता या निवेदनानंतर प्रशासन आणि बँक व्यवस्थापन ग्राहकांच्या या न्याय्य मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




