गिरीश आंदे
तेलकामठी येथील बाजार चौक परिसरात श्री नारायण देव महापूजा (बिज) उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ ते गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पारंपरिक पद्धतीने पशु पकडणे व भिक्षा मागणे हा धार्मिक विधी पार पडला. या विधीसाठी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बुधवार दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता श्री नारायण देवाची भव्य महापूजा संपन्न झाली. आकर्षक सजावट, मंत्रोच्चार आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या महापूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता देवफेरी काढण्यात आली. देवफेरीनंतर भाविकांसाठी गोड जेवणाचा प्रसाद वाटप करण्यात आला. याच दिवशी उत्सवाची सांगता झाली.
हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम बाजार चौक, तेलकामठी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर येथे पार पडला. समस्त भोई समाज व मित्र परिवार, तेलकामठी यांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले.




