Home समस्या महावितरण व पॉलीकॅबची मनमानी उघड – सार्वजनिक बांधकाम विभागाची ठाम भूमिका परवानगीशिवाय...

महावितरण व पॉलीकॅबची मनमानी उघड – सार्वजनिक बांधकाम विभागाची ठाम भूमिका परवानगीशिवाय काम केल्याचा आरोप,वनविभागाची बघ्याची भूमिका

79
0

गिरीश आंदे
सावनेर–तिष्टी मार्गे काटोल रोडवरील सावंगी व तेलकामठी परिसरात महावितरणकडून नवीन वीजवाहिनी उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. मात्र, तोडलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर व दुतर्फा टाकून दिल्याने हा मार्ग अक्षरशः अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ सुरू असतानाही महावितरण,पॉलीकॅब, वनविभाग जबाबदारी ढकलताना दिसत आहेत.
रस्त्यावर सर्वत्र पसरलेल्या मोठमोठ्या फांद्यांमुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पहाटे व रात्रीच्या वेळी धुके असताना एखादी गंभीर दुर्घटना घडणे अटळ असल्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
या प्रकाराबाबत कळमेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण शिरपूरकर यांनी,“वीजवाहिनीखालील फांद्या तोडण्याचे अधिकार महावितरणला आहेत. वनविभाग झाडे तोडत नाही,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृक्षतोडीस परवानगी देणे, नियमांचे पालन होत आहे की नाही यावर नियंत्रण ठेवणे व सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवणे हे वनविभागाचे कायदेशीर कर्तव्य असल्याचा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान,इंडिया लाईव्ह तेज न्यूजने यापूर्वीही हा मुद्दा उचलून धरल्यानंतर पुन्हा संबंधित विभागांकडून माहिती घेतली असता परस्परविरोधी खुलासे समोर आले आहेत.
महावितरण कार्यालय तेलकामठी येथील कनिष्ठ अभियंता दीपिका चव्हाण यांनी सांगितले की,“संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणला कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. नवीन लाईनचे काम सुरू आहे.
मात्र, जुन्या लाईनखालील वृक्षतोड न झाल्याने अनेकदा यांच्या हद्दीत लाईनची समस्या निर्माण होते.”
सावनेर विभागातील पॉलीकॅबचे इन्चार्ज सागर देहनकर यांनीही,“महावितरणला कोणतीही परवानगी लागत नाही. त्यांच्या आदेशानुसारच आम्ही काम करत आहोत. कामानंतर फांद्या बाजूला ठेवतो,” असे सांगितले.
मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावर अजूनही फांद्या पडलेल्या असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
या प्रकरणाला वेगळेच वळण देत सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वरचे उपविभागीय अभियंता सुहास ओचावर यांनी गंभीर आरोप केला.
“महावितरण व पॉलीकॅबने कोणतीही परवानगी न घेता कळमेश्वर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत काम केले आहे. त्यांच्याकडे कोणताही शासन निर्णय नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार अशा प्रकारे परवानगीशिवाय काम केले असल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या सगळ्या गोंधळात प्रशासनाची निष्क्रियता ठळकपणे समोर येत असून,“अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?”
“मृतदेह पडल्यानंतरच कारवाई होणार का?”असे संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
हा मार्ग शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि अवजड वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा असताना, अद्याप कोणतीही तातडीची उपाययोजना न होणे हे गंभीर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांकडून पुढील मागण्या जोर धरू लागल्या आहेत —
• रस्त्यावरील सर्व फांद्या तातडीने हटवाव्यात
• वाहतूक सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात
• जबाबदार अधिकारी व संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाई करावी
या दुर्लक्षामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण,पॉलीकॅब, वन विभाग आणि संबंधित प्रशासनावर निश्चित केली जाईल,असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here