Home जागरुकता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या गोंडखैरी,चौदा मैल, अमरावती रोडवरील हॉटेल...

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या गोंडखैरी,चौदा मैल, अमरावती रोडवरील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांवर धडक कारवाई एकुण 6 सिलेंडर जप्त

40
0

गिरीश आंदे
घरगुती वापरासाठी सबसिडीवर उपलब्ध असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री आनंद पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसिलदार कळमेश्वर विकास बिक्कड यांच्या नेतृत्वात दिनांक 18 मार्च 2026 रोजी तालुक्यातील गोंडखैरी,अमरावती रोड या परिसरात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत पथक प्रमुख मंगेश ढवळे निरीक्षण अधिकारी तसेच भरत ब्राह्मणकर गोदाम व्यवस्थापक व प्रविण मानकर पुरवठा निरीक्षक, रविंद्र गावंडे यांच्या पथकाने कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी परिसर अमरावती रोड, चौदा मैल अश्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान विविध हॉटेल्स,ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर तपासणी करण्यात आली.
या कारवाईत घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करताना आढळलेल्या व्यावसायिकांकडून एकूण 6 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. ही सिलेंडर सबसिडीचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक हेतूने वापरली जात होती, ज्यामुळे युद्ध जन्य परिस्थितीत सरकारच्या सबसिडी योजनेचा दुरुपयोग होत होता आणि सामान्य नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा प्रभावित होत होता.
व्यावसायिकांनी निळ्या रंगाचे कमर्शियल एलपीजी सिलेंडर वापरावेत.घरगुती (लाल रंगाचे) सिलेंडरचा व्यावसायिक वापर हा कायद्याने गुन्हा आहे.
घरगुती गॅस सिलेंडर फक्त घरगुती वापरासाठीच आहेत. व्यावसायिकांनी निळ्या रंगाचे कमर्शियल सिलेंडर वापरावेत. व्यावसायिक वापर हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यापुढे सतत छापे आणि तपासणी मोहीम सुरू राहील. यामध्ये दोषी आढळलेल्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.
जप्त करण्यात आलेली सिलेंडर संबंधित गॅस वितरकांना सुपूर्द करण्यात आलेले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या प्रकारची कारवाई डिसेंबर महिन्यात सुद्धा पथकाद्वारे झालेली असून 14 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आली होती. तसेच तालुक्यांतील नागरिकांना व व्यावसायिकांना तहसिलदार विकास बिक्कड यांनी आवाहन केले की, घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर किंवा काळाबाजार करू नये.व्यावसायिकांनी निळे कमर्शियल सिलेंडर वापरावेत.अधिक माहितीसाठी पुरवठा विभाग, तहसिल कार्यालय येथे संपर्क साधावा,असे मंगेश ढवळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here