मौदा
ग्राहक म्हणून कायम जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे, ग्राहक हा राजा असतो आणि ग्राहक राजाला अनेक प्रकारच्या समस्यांचे निराकरण व्हावे ह्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नेहमीच प्रयत्नशील असते. तालुक्यातील ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी अ.भा. ग्राहक पंचायत संघटना येत्या काळात गावागावांत अ.भा. ग्राहक पंचायत पोहचविण्याचे आवाहन विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी केले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मौदा तालुका कार्यकारिणी घोषित करण्याचा कार्यक्रम मौदा येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहात रविवार दि. २७ जुलै रोजी जिल्हा अध्यक्ष संजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांत संघटक अभय खेडकर, प्रांत सचिव चारुदत्त चौधरी, प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, जिल्हा उपाध्यक्ष मधूकर पोटे, जिल्हा सचिव प्रभाकर शिवणकर, प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान अभय खेडकर, चारुदत्त चौधरी, संजय साळवे, श्रीपाद भट्टलवार यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले.
मौदा तालुक्यातील ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अ. भा. ग्राहक पंचायत मौदा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी दिनेश ढोबळे, उपाध्यक्षपदी दिगांबर बांगडकर, सुरेंद्र बम्नोटे, सचिवपदी अजय मते, सहसचिव पदी ईश्वर पत्रे, महेंद्र चकोले, कोषाध्यक्ष पदी डॉ. सुनील बोरकर, प्रसिद्धी प्रमुख पदी संजय गिरडे, कार्यालयीन प्रमुख पदी वसंता मोथरकर, महिला प्रमुख पदी शिला तुरनकर, सह महिला प्रमुख पदी विद्या टोंपे, विधी आयाम प्रमुख पदी ॲड. मिनल रावते, पर्यावरण प्रमुख पदी गुलाब तुरनकर, रोजगार सृजन प्रमुख पदी वसंता पत्रे, आयटी सेल प्रमुख पदी सुनील ठाकरे तसेच कार्यकारिणी सदस्य, डॉ . निलिमा घाटोळे (मार्गदर्शक), अर्चना रंगारी, मिना माथनीकर, उषा धांडे, जयश्री बावनगडे, हिना भिवगडे, डॉ. रेवाराम घाटोळे, सुभाष भदाडे, एकनाथ कापगते, प्रशांत पवार आदिंचा समावेश आहे.
जागो ग्राहक जागो !
ते पुढे म्हणाले की, “खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काही दोष असल्यास आपल्या मुला-बाळांना त्याची बाधा होऊ शकते. म्हणूनच खरेदी केलेल्या वस्तूंची पावती घेण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. ‘ग्राहक राजा’ आहे असे नुसते बोलून चालणार नाही, तर तेवढीच जागरूकता आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दाखवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्राहक हा राजा होईल. यानिमित्ताने आपण सगळे निर्धार करूया की, आपण नुसतेच ग्राहक न होता सुजाण आणि जागरूक ग्राहक बनूया. जागो ग्राहक जागो,” असेही ते म्हणाले. संघटनेत भावनेला थारा नाही, संघटनेत कोण्या एका व्यक्तीसाठी नाही तर संघटनेसाठी काम करण्याचे आवाहन प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे यांनी प्रास्ताविकातून केले आहे. यावेळी मौदा तालुका संघटनेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा पाढा वाचला. सूत्रसंचालन दिगांबर बांगडकर तर आभार प्रदर्शन ईश्वर पत्रे यांनी केले.




