Home सांस्कृतिक व सामाजिक मकरसंक्रांतीनिमित्त प्रिया रमेश मानकर यांच्या घरी भव्य हळदीकुंकवात आजींची आदरपूर्वक ‘लूट’

मकरसंक्रांतीनिमित्त प्रिया रमेश मानकर यांच्या घरी भव्य हळदीकुंकवात आजींची आदरपूर्वक ‘लूट’

70
0

गिरीश आंदे
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर धापेवाडा येथे एक सामाजिक जाणीव जपणारा आणि भावनिक ठरलेला हळदीकुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक २० जानेवारी २०२६, मंगळवार रोजी प्रिया रमेश मानकर यांनी आपल्या राहत्या घरी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गावातील सर्व वयोवृद्ध आजींची आदरपूर्वक आणि प्रेमाने ‘लूट’ करण्यात आली. या अनोख्या संकल्पनेमुळे समाजात वयोवृद्ध व्यक्तींप्रती आदर, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला. या प्रसंगी अनेक आजी भावूक झाल्या असून आनंदाश्रूंनी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. उखाणे स्पर्धा, लकी ड्रॉ, संगीत खुर्ची अशा खेळांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणा मानकर तसेच धापेवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगला शेटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यासह गावातील प्रतिष्ठित महिला, महिला मंडळाच्या सदस्य, वयोवृद्ध आजी तसेच तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, उत्साही आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला. सर्वांच्या सहकार्याने व उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा हळदीकुंकवाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here