गिरीश आंदे
भारतीय संस्कृती, परंपरा आणि बालपणातील निरागस आनंदाचा सुंदर संगम घडवून आणणारा तान्हा पोळा उत्सव कामाक्षी सेलिब्रेशन, सावनेर येथे उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. घाटोडे परिवाराच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यंदा सलग पाचव्या वर्षी पार पडला.
उत्सवात चिमुकल्या बालगोपाळांनी आकर्षक पद्धतीने सजविलेले बैल घेऊन मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी सजावट आणि बालकांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंदामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून गेला.
कार्यक्रमाला सावनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सागर खर्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी परिसरातील मान्यवर नागरिक, पालक तसेच बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तान्हा पोळ्यानिमित्त ‘उत्कृष्ट बैल सजावट’ आणि ‘सर्वोत्तम वेशभूषा’ अशा दोन आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या बालकांना प्रथम, द्वितीय तसेच प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सर्वोत्तम वेशभूषा स्पर्धेतील विजेते
सर्वोत्तम वेशभूषा स्पर्धेत जय सावरकर याने प्रथम क्रमांक, तर रियांश करोकार याने द्वितीय क्रमांक पटकावला. जक्ष महाजन आणि हिमानी ठाकरे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला.
उत्तम बैल सजावटीत यशवी, अक्षवी अव्वल
उत्तम बैल सजावट स्पर्धेत यशवी भोबडे हिने प्रथम, तर अक्षवी महाजन हिने द्वितीय क्रमांक मिळविला. दक्ष शेंदरे, शिवांश घाटोडे आणि विपुल सावरकर यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व बालकांचे आणि त्यांच्या पालकांचे घाटोडे परिवाराकडून विशेष कौतुक करण्यात आले. चिमुकल्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी त्यांना बिस्कीट व चिक्कीचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांना पारंपरिक दहीकाला प्रसादाचे वाटप करण्यात आले.
पालकांचा उत्साह, चिमुकल्या बालगोपाळांचा आनंद आणि पारंपरिक संस्कृती जपण्याची आयोजकांची भावना यामुळे यंदाचा तान्हा पोळा विशेष ठरला. मागील पाच वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या उपक्रमामुळे कामाक्षी सेलिब्रेशन हे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र बनत असल्याची भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला. उपस्थित पालकांनी कामाक्षी सेलिब्रेशन आणि घाटोडे परिवाराचे मनापासून कौतुक करून आभार मानले.




