Home सामाजिक मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय राज्यात...

मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

78
0

गिरीश आंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी ‘क्षेत्रीय कार्यालयांसाठी १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा मूल्यांकन उपक्रम’ राबविण्यात आला. या उपक्रमात महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांचा सहभाग होता. सदर मोहिमेचे मूल्यांकन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) या संस्थेमार्फत करण्यात आले.
या मूल्यांकनात पोलीस विभागांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वोत्तम ५ पोलीस अधीक्षक कार्यालयांची निवड करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रामीण यांनी २०० पैकी १६१ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत
१) कार्यालयाचे संकेतस्थळ,
२) आपले सरकार प्रणाली,
३) ई-ऑफिस,
४) कार्यालय डॅशबोर्ड,
५) व्हॉट्सॲप चॅटबॉट,
६) अभिनव प्रकल्प
या बाबींवर प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. नागपूर ग्रामीण पोलीस दलाने सर्व उद्दिष्टे १०० टक्के पूर्ण करून आधुनिक, पारदर्शक व लोकाभिमुख पोलिसींगच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ nagpurgraminpolice.gov.in वर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांतील व्हॉट्सअॅप AI चॅटबॉट उपलब्ध असून नागरिकांना तक्रार, सूचना व सेवा-संबंधित माहिती सहज मिळत आहे. दिव्यांग नागरिकांसाठी व्हॉइस सर्च सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गुन्हे तपासासाठी MahaCrimeOS AI Copilot चा प्रभावी वापर करण्यात येत असून, १२७ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामार्फत २६० पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये जलद तपास करून गुन्हे उघड करण्यात यश आले आहे.
अभिनव प्रकल्पांतर्गत
AI/Blockchain/DigiLocker आधारित SMART Muddemal Automation प्रणाली,
GIS/Remote Sensing आधारित MARVEL प्रकल्प द्वारे टेलिकॉम डेटा मॅपिंग, Behavioral Analysis, Face Detection, Object Detection यांचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे जिल्ह्यात ८ प्रकरणांमध्ये MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तसेच Smart Beat Patrolling Monitoring System द्वारे GIS मॅपिंग व ट्रॅकिंगच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी पर्यवेक्षण केले जात आहे.‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे चरित्र पडताळणी, पासपोर्ट पडताळणीसह विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या असून, दुर्गम भागात जनजागृती केल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे.
आज २६ जानेवारी २०२६ रोजी, नागपूर येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर झालेल्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभात, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते,पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार व अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here