(मौदा तालुका प्रतिनिधी)
मौदा तालुक्यातील पावडदौना येथील परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रमात दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक हवनकार्य, झेंडावंदन व भव्य मानव धर्म सेवक मेळावा उत्साहात पार पडला. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे अंधश्रद्धामुक्त, व्यसनमुक्त व मानवतेवर आधारित समाजनिर्मितीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास हजारो सेवक बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात हवनकार्य व ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर मानव जनजागृतीवर आधारित भजन कार्यक्रम, मानव धर्म कार्यावर चर्चासत्र, क्रीडा स्पर्धा, बक्षीस वितरण व सहभोजन असे विविध उपक्रम पार पडले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने हे होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र गायधने यांनी,“मी पणा व अहंकार सोडून बाबा जुमदेवजींच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगल्यासच खरे सुख प्राप्त होते,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव कथन करताना, मागील वर्षी सेवक मेळाव्यात झालेल्या अपमानाचा उल्लेख केला व “भगवंत न्याय करतो,” असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्याला उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी,“महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची शिकवण म्हणजे माणूस घडवणारी फॅक्टरीच आहे,” असे प्रतिपादन केले. ते म्हणाले, “माणूस रक्त तयार करू शकत नाही, ते माणसाच्या शरीरातच तयार होते, पण त्याच माणसाला माणूसकी शिकवण्याचे कार्य बाबांनी करून दाखवले. शासन अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीसाठी मोठा खर्च करते, मात्र जे कार्य शासनालाही जमले नाही ते बाबा जुमदेवजींनी प्रत्यक्ष करून दाखवले.” बाबांनी दिलेले चार तत्व, तीन शब्द व पाच नियम ही माणुसकीची शिकवण दोन-तीन राज्यातपूर्ती मर्यादित न राहता राष्ट्रव्यापी व्हावेत, यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी वाठोडा (नागपूर) येथील सेवक जयंत खोरे यांनी स्वखर्चातून तब्बल ३० लाख रुपये खर्चून हायफाय शौचालय बांधून दिल्याबद्दल तसेच धन्नुलाल साहू यांनी १३.५ लाखांची शेती मंडळाला बक्षीसपत्राने प्रदान केल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार परिणय फुके यांच्यासह राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सरपंच शिला वांगे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार टेकचंद सावरकर, मौदा नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, चांगोजी तिजारे, यांच्यासह अनेक मान्यवर, प्रशासनातील अधिकारी व मार्गदर्शक, सेवक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाध्यक्ष रविंद्र गायधने, उपाध्यक्ष देवराम तुमसरे, सचिव किरण राऊत, सहसचिव प्रदीप चौधरी, कोषाध्यक्ष सुभाष दहेकर व सर्व संचालक मंडळाने परिश्रम घेतले. हा मेळावा मानव धर्माच्या विचारांना नवी ऊर्जा देणारा ठरला.
मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे बाबा जुमदेवजींच्या जीवनावर आधारित भव्य कलाप्रदर्शनी बाबांचा जीवनप्रवास विविध प्रसंगांतून साकारण्यात आला. उत्कृष्ट झांक्यांना पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती सचिव किरण राऊत यांनी दिली.
कार्यक्रमासाठी तहसील व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. कार्यक्रमाचे संचालन किरण राऊत, आभार रवींद्र खापरे यांनी मानले तर सायंकाळची प्रार्थना रामेश्वर जोगी यांनी केली. हजारो मार्गदर्शक व लाखो सेवकांच्या उपस्थितीने हा मेळावा यशस्वी ठरला.


