अशोक काळबांडे (भागेमहारी)
भागेमहारी येथील आनंद बुद्ध विहाराजवळील बालोद्यान परिसरात असलेले मोठे पिंपळाचे झाड सध्या संभाव्य अपघाताचे कारण ठरू शकते. या झाडालगत महावितरणची हाय टेन्शन वीजवाहिनी गेली असून, झाडाच्या वाढलेल्या फांद्या व पाने वारंवार वीजतारांना स्पर्श करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
पावसाळा आणि वाऱ्याच्या दिवसांत झाडाच्या फांद्या अधिक हलत असल्याने त्या हाय टेन्शन वीजवाहिनीला लागतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे, आग लागणे किंवा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बालोद्यान व आनंद बुद्ध विहार परिसरात लहान मुले आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने हा धोका अधिक गंभीर मानला जात आहे.
या संभाव्य दुर्घटनेची दखल घेत भागेमहारी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत व महावितरण प्रशासनाला तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. झाडाच्या धोकादायक फांद्यांची योग्य पद्धतीने छाटणी करून वीजवाहिनी सुरक्षित करण्याची तसेच भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Home समस्या भागेमहारीत हाय टेन्शन वीजवाहिनीला लागून असलेल्या पिंपळाच्या झाडामुळे दुर्घटनेचा धोका – नागरिकांची...




