मौदा तालुक्यातील कोदामेंढी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत दि. ७ मार्च रोजी कोदामेंढी ग्रामपंचायत कार्यालयात एक दिवसीय विशेष शिबीर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात विविध सरकारी विभागांनी एकत्र येऊन ग्रामस्थांच्या प्रलंबित समस्यांचे तात्काळ निराकरण केले. शेतकरी, महिलांसह सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा झाला.
शिबिरात सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत एकूण ६९४ अर्ज दाखल झाले. त्यापैकी ६६३ अर्जांचे त्वरित निपटारे करण्यात आले, तर केवळ ३१ अर्ज प्रलंबित राहिले. हे प्रमाण तब्बल ९५.५३ टक्के समस्या सोडवण्याचे यश दर्शवते. विभाग प्रमुखांची कामगिरी अतिशय समाधानकारक राहिली. आरोग्य विभागाने १८० पैकी १८० अर्ज, कृषी विभागाने (पी.एम. किसान व AgriStack) १२३ पैकी १२३, आधार नोंदणी ७२ पैकी ७२, महसूल विभागाने ११७ पैकी ११७, पशुसंवर्धन विभागाने ४७ पैकी ४७ अर्ज पूर्ण केले. पुरवठा विभागाने राशन कार्डसाठी ५६ पैकी ४८, संजय गांधी योजनेचे ६२ पैकी ५६ अर्ज निकाली काढले. निवडणूक विभागाने १४ पैकी १४ अर्ज पूर्ण केले.
शिबिराला उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कल्याणकुमार डहाट, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संजय गेडाम, योगिता दराडे, मंडळ अधिकारी अनिल भगत, गोपाल फुलउंबरकर, गटशिक्षणाधिकारी डॉ. महेश बेहेकर, तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील, उपअधीक्षक भूमी अभिलेख योगिता झिले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हे अभियान महसूल विभागाच्या माध्यमातून मार्च ते मे २०२६ पर्यंत राज्यभर राबवले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या “रयतेच्या कल्याणाला प्राधान्य” या तत्त्वाने प्रेरित या उपक्रमामुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी होत असून, ग्रामस्थांनी या यशस्वी शिबिराबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत.




