Home समस्या नेवली तलावात लाखोंचा लाकूड साठा – वन विभाग व लघु पाटबंधारे उपविभागावर...

नेवली तलावात लाखोंचा लाकूड साठा – वन विभाग व लघु पाटबंधारे उपविभागावर जबाबदारी ढकलण्याचा आरोप, ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

82
0

गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी गावाजवळ असलेल्या नेवली तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर लाकूड साठवून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तलावाच्या काठावर लाखो रुपयांचे लाकूड खुलेआम रचून ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून तलाव परिसरात रात्रीच्या सुमारास वाहनांची संशयास्पद ये-जा वाढली होती. त्यानंतर तलावालगतच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर लाकूड साठवून ठेवलेले आढळून आले. या लाकडाची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाकूड साठवणूक होत असताना वन विभाग आणि जिल्हा लघु पाटबंधारे उपविभाग सावनेर यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नेवली तलाव हा लघु पाटबंधारे उपविभागाच्या अखत्यारीत येत असतानाही या प्रकाराकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या संदर्भात तेलकामठी येथील वनसहाय्यक राहुल हुलकाने यांनी सांगितले की, “तलाव परिसरात लाकूड साठा असल्याची माहिती आहे; मात्र त्याला परवानगी आहे की नाही याबाबत माहिती नाही.” तसेच “नेवली तलाव परिसर आमच्या विभागाच्या हद्दीत येत नसून तो जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण शिरपूरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.
जिल्हा लघु पाटबंधारे उपविभाग सावनेरचे अभियंता योगेश इंगळे यांनी सांगितले की, “या प्रकरणाची माहिती घेऊन ग्रामपंचायत तेलकामठी किंवा कोणाला तरी पाठवून संबंधितांना लाकूड हटवण्याबाबत सूचना देण्यात येतील.”
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून तलाव परिसराचा वापर लाकूड डेपोप्रमाणे होत असल्याने पर्यावरण व जलस्रोत धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या लाकूड साठ्यामागे बाहेरून आलेल्या काही व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा असून त्यामागे स्थानिक पातळीवरील राजकीय पाठबळ असल्याचीही चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून पंचनामा करण्यात यावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here