Home जागरुकता तेलकामठी येथे ७ मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ –...

तेलकामठी येथे ७ मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ – १५ हून अधिक महसुल सेवांचा लाभ एकाच ठिकाणी

133
0

गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी महसूल मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानाच्या टप्पा क्र. १ अंतर्गत शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत समाजभवन, बाजार चौक, तेलकामठी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये महसूल मंडळातील नागरिकांना १५ पेक्षा अधिक महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र आदी सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच अकृषिक (NA) परवानगी व संबंधित तरतुदींबाबत मार्गदर्शन, नवीन व्यवस्थापनानुसार ‘सनद’ प्रक्रियेची माहितीही देण्यात येणार आहे.
याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंदर्भातील प्रकरणांचा निपटारा, घरकुलासाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज स्वीकृती, ॲग्रीस्टॅक व पीएम-किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. महसूल मंडळातील इतर विभागांकडूनही नागरिकांना विविध सेवा पुरविण्यात येतील.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कळमेश्वरचे तहसीलदार विकास बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली तेलकामठी महसूल मंडळाचे नायब तहसीलदार संजय कांबळे यांनी केले आहे. त्यांनी १ मार्च २०२६ रोजी मंडळातील गावांमध्ये जनजागृती करून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह शिबिरस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी मंडळ अधिकारी शरद बोरकर, तलाठी इरफान जॉनीवाले, रामनाथ आडे, निता मेघरे, रोहिणी वाघमारे, ग्रामसेवक सुनील भोयर, कोतवाल मनोज ऊईके तसेच पोलीस पाटील बेबी घोळसे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here