Home राजकीय कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेत चार उमेदवारांची माघार – १० नगराध्यक्ष व ७८ नगरसेवक उमेदवारांमुळे...

कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेत चार उमेदवारांची माघार – १० नगराध्यक्ष व ७८ नगरसेवक उमेदवारांमुळे राजकीय हालचालींना वेग

52
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी (शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर) चार उमेदवारांनी माघार घेतली असून यामुळे स्थानिक राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे. एका नगराध्यक्षपदाच्या आणि तीन नगरसेवकपदांच्या उमेदवारांच्या माघारीनंतर आता नगराध्यक्षपदासाठी १० आणि नगरसेवकपदांसाठी ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.
नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या १२ अर्जांपैकी छाननीदरम्यान एक अर्ज अवैध ठरविण्यात आला. नंतर सुरेश नत्थूजी डोंगरे यांनी त्यांच्या दोन अर्जांपैकी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे नगराध्यक्षपदाची धुरंधर लढत १० उमेदवारांपुरती मर्यादित झाली आहे. विविध पक्ष व गटांमध्ये अंतर्गत चर्चा, बैठका व रणनीती आखण्यांची हालचाल सुरू असून पुढील काही दिवसांत या राजकीय रणनितीत आणखी बदल अपेक्षित आहेत.
नगरसेवकपदांसाठी एकूण ८५ अर्ज दाखल झाले होते. त्यातील छाननीनंतर ८२ उमेदवार स्पर्धेत होते. मात्र, पंकज कुरळकर, प्रशांत इखार, घनश्याम मक्कासरे आणि अनसूया उके यांनी अर्ज मागे घेतल्याने हा आकडा आता ७८ वर आला आहे. या ७८ उमेदवारांपैकी २१ जणांची निवड होणार असल्याने विविध प्रभागांत प्रचारयुद्ध अधिक चुरशीने रंगण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत बसपा,शिवसेना (एकनाथ शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), प्रहार, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश असल्यामुळे बहुपक्षीय संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.
माघारीनंतरचे हे बदल स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हे दाखवत असून कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेतील निवडणूक वातावरण आता अधिकच तापलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here