Home समस्या चिन्हाविना अपक्षांचे हाल – प्रचार ठप्प,२६ नोव्हेंबरनंतरच खरा रणसंग्राम!

चिन्हाविना अपक्षांचे हाल – प्रचार ठप्प,२६ नोव्हेंबरनंतरच खरा रणसंग्राम!

40
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर–ब्राह्मणी आणि मोहपा नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले. सर्व प्रभागांत उमेदवारांची मोर्चेबांधणी वेगाने सुरू आहे. नामांकन दाखल व छाननी प्रक्रियेनंतर कोण रिंगणात आहे, हे स्पष्ट झाले असून पक्षीय उमेदवारांनी दमदारपणे प्रचारयात्रेला गती दिली आहे.
मात्र अपक्ष उमेदवारांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. अनेक बंडखोर व नवीन चेहऱ्यांचे नामांकन वैध ठरले तरी निवडणूक चिन्ह मिळेपर्यंत त्यांचा प्रचार अक्षरशः ठप्प आहे. मतदार विचारतात— “तुमचं चिन्ह कोणतं?” पण चिन्ह जाहीर होणार नसल्याने हे उमेदवार निरुत्तर होत आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार अपक्षांना २६ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असून प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ ५–६ दिवसांचा मर्यादित कालावधी राहणार आहे. इतक्या कमी वेळात संपूर्ण प्रभाग पिंजून काढणे, भौगोलिक विस्तार आणि मतदारसंख्या बघता, जवळपास अशक्यप्राय ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान पक्षीय उमेदवारांनी पहिली प्रचारफेरी पूर्ण केली असताना अपक्षांचे इंजिन अद्याप सुरुही झालेले नाही. आता २६ नोव्हेंबरनंतरच या अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला खरा वेग मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here