Home राजकीय कळमेश्वर–ब्राह्मणी व मोहपा येथे पक्षांच्या यादीकडे मतदारांचे लक्ष – नगराध्यक्षपदासाठी माकोडे,मंडपे,श्रोते,चर्जन चर्चेत

कळमेश्वर–ब्राह्मणी व मोहपा येथे पक्षांच्या यादीकडे मतदारांचे लक्ष – नगराध्यक्षपदासाठी माकोडे,मंडपे,श्रोते,चर्जन चर्चेत

79
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर–ब्राह्मणी आणि मोहपा नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या नावांवर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. शनिवारपर्यंत एकाही पक्षाने अधिकृत उमेदवार यादी जाहीर न केल्याने स्थानिक राजकारणात अनिश्चितता वाढली असून मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कळमेश्वर–ब्राह्मणीत माकोडे व मंडपे आघाडीवर ?
कळमेश्वर–ब्राह्मणी नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत संभाव्य उमेदवारांची चलबिचल सुरू झाली आहे. भाजपमध्ये अविनाश माकोडे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून त्यांना वरिष्ठ नेतृत्वाचा हिरवा कंदील मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक विकासकामांतील सहभाग, संघटनातील कार्य आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा या कारणांमुळे माकोडे यांचे नाव पुढे असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे,काँग्रेसकडून सरजू मंडपे हे नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. स्थानिक समाजघटकांमध्ये असलेला त्यांचा संपर्क, अनुभवी नेतृत्व आणि सर्वसमावेशक राजकारण यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या अंतर्गत बैठका सुरू असून मंडपे यांच्या नावावर बर्‍याच प्रमाणात सहमती असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

मोहप्यात श्रोते–चर्जन यांच्यात चुरस?
मोहपा नगरपरिषदेतही अशीच कुजबुज सुरू असून नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दोन नावे चर्चेतील आहेत. भाजपकडून प्रवीण श्रोते हे आघाडीवर असून गेल्या काही वर्षांतील त्यांचे संघटनातील सक्रिय योगदान व स्थानिक नेतृत्वाशी असलेले सलोख्याचे संबंध त्यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल ठरत असल्याचे म्हटले जाते.
काँग्रेसमध्ये माधव चर्जन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. स्थानिक राजकारणातील त्यांची ओळख, युवकांमध्ये असलेली लोकप्रियता आणि नगरपरिषदेसाठी मांडलेली विकासाची भूमिका या गोष्टी त्यांच्या बाजूने जात आहेत. काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील काही गटांकडूनही चर्जन यांना पाठिंबा मिळत असल्याचे वृत्त आहे.
अधिकृत घोषणेची मतदारांना प्रतीक्षा
दोन्ही नगरपरिषदांमध्ये प्रबळ पक्ष कोण आणि निवडणुकीत कोणाची आघाडी राहणार याबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अनेकांनी पक्ष नेतृत्वाकडे लवकरात लवकर उमेदवारीबाबत स्पष्ट घोषणा करण्याची मागणी केली आहे. यादी अंतिम होण्यापूर्वी अजून काही नवीन नावे समोर येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
पक्षीय नेत्यांच्या निवडीवर स्थानिक विकास, पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि शहराच्या विस्तार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा परिणाम अपेक्षित आहे. त्यामुळे उमेदवार घोषित झाल्यानंतरच निवडणुकीची खरी लढत रंगणार असून मतदारांच्या अपेक्षांची कसोटी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here