नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावनेरमध्ये उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, विविध पक्षांच्या उमेदवारांकडून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अश्विनी पंकज घाटोडे यांनी आपले नामांकन दाखल केले. या वेळी विविध प्रभागांतील १५ कार्यकर्त्यांनीही उमेदवारी दाखल केली.
अश्विनी घाटोडे या उच्चशिक्षित असून कॉर्पोरेट क्षेत्रात HR म्हणून दीर्घ अनुभव त्यांनी मिळवला आहे. शहराच्या विकासासाठी व्यवस्थापन कौशल्य आणि नियोजनशक्तीची गरज असल्याचे काही नागरिकांचे मत आहे.
आम आदमी पार्टीचे सावनेर तालुकाध्यक्ष पंकज घाटोडे यांनी शिक्षण,आरोग्य,रस्ते,पाणीपुरवठा,महिला सुरक्षा आणि युवकांच्या प्रश्नांवर काम केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
सावनेरमधील पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची अवस्था,आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांसारखे प्रश्न नागरिकांकडून सातत्याने मांडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून आगामी निवडणुकीत जनतेचा कल कुणाकडे असेल याची उत्सुकता वाढत आहे.
आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची एन्ट्री राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, नागरिकांमध्ये बदलाची मागणी आणि पारंपरिक पक्षांविषयीची नाराजी याबाबतही चर्चा ऐकू येत आहे. मात्र अंतिम निर्णय मतदारच ठरवतील.




