गिरीश आंदे
केळवद व हट्टीसरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टीने अधिकृत उमेदवार जाहीर करत दमदार सुरुवात केली. केळवद येथून प्रकाश मोहन ढोबळे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला असून, हत्तीसरा येथून सूरज प्रभाकर गुडधे या युवा चेहऱ्याला पक्षाने समर्थन दिले आहे.
दुधाच्या उद्योगात क्रांती घडवून आणत शेतकऱ्यांच्या विश्वासाचे केंद्र बनलेले प्रकाश मोहन ढोबळे हे नेहमीच जनतेच्या मदतीसाठी तत्पर असणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याची दखल घेत आम आदमी पार्टीने त्यांना केळवदकरांसाठी सरपंच पदाचा अधिकृत उमेदवार घोषित केले आहे.
तसेच हत्तीसरा ग्रामपंचायतीत सूरज प्रभाकर गुडधे या होतकरू, तरुण आणि जनसंपर्कात मजबूत असलेल्या नेतृत्वावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असताना त्यांनी हत्तीसरा, कवठा आणि आष्टी परिसरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात उतरत असून, ही पोटनिवडणूक आता अत्यंत रंगतदार आणि त्रिकोणी लढत ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. ‘आजी, माजी आणि भावी आमदार’ अशी सरस चर्चा सध्या जनतेमध्ये पाहायला मिळत आहे.
पंकज घाटोडे यांनी आमदारकी निवडणूक लढवल्यानंतर क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून सर्व निवडणुकांमध्ये प्रभावी नेतृत्व केले आहे. त्यामुळे “भावी आमदार” म्हणून त्यांची ओळख गावा-गावात पोहोचली असून, आम आदमी पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी केळवद येथे मोरेश्वर वाघमारे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर हत्तीसरा येथे शुभम साबळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा सचिव जामुवंत वारकरी यांनी दिली.
एकूणच, आम आदमी पार्टीची ही दमदार एन्ट्री ग्रामपंचायत निवडणुकीत नवे समीकरण निर्माण करत असून, येणाऱ्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आज सरपंच पदाचा फॉर्म भरत असताना आम आदमी पार्टी चे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Home राजकीय केळवद–हत्तीसरा ग्रामपंचायत निवडणुकीत ‘आप’चा प्रवेश; अधिकृत उमेदवार जाहीर करत दमदार सुरुवात




