मौदा (तालुका प्रतिनिधी)
“वनराज की वनविनाश?” असा सवाल उपस्थित करत मौदा तालुक्यात वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नानादेवी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रहाडी शिवारात वाघाने थैमान घालत चार जनावरे ठार, तर पाच जनावरे जखमी करून एक गाय व एक गोरा गायब केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
रहाडी शिवारातील शेतकरी लक्ष्मण महादेव गवळी यांच्या प्रत्येकी २० हजार रुपये किंमतीच्या तीन तीन वर्षाच्या तीन गोऱ्यांना वाघाने ठार केले, तर तीन जनावरे जखमी झाली आहेत. याशिवाय एक गाय व एक घोडा बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. त्याच परिसरातील जगन महादेव गवळी यांच्या एका गाय व एका बैलावरही वाघाने हल्ला करून किरकोळ जखमी केले आहे. तर मोरेश्वर बावणे यांच्या पंधरा हजार रुपये किमतीच्या दोन वर्षाच्या गोरिला वाघाने ठार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या चार दिवसात आठ जनावरे ठार – प्रशासन अजून एक गप्प?
१० डिसेंबर रोजी आश्रम परिसरात दोन गाई,११ डिसेंबर रोजी माथनी शिवारात दोन गाई,आणि १३ डिसेंबर रोजी रहाडी शिवारात चार जनावरे ठार सलग चार दिवसांत आठ जणावरांचा बळी जाऊनही वाघाचा बंदोबस्त न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महसूल व वन विभाग घटनास्थळी व पंचनामे
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे मंडळाधिकारी रूपराज पर्वते, तलाठी अंजली सायरे, तसेच वनविभागाचे अधिकारी अंकुश नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच पांडुरंग आस्वले, भाजप नेते नरेश मोटघरे, माजी जि.प. सदस्य देवेंद्र गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबदला नव्हे, आधी जीविताची हमी द्या! – शेतकऱ्यांच्या आक्रोश
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा तात्काळ व जास्तीत जास्त मोबदला द्यावा, अशी ठाम मागणी सरपंच पांडुरंग आस्वले यांनी केली. तर दरम्यान, वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याबाबत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती देण्यात आली असून त्यांनी हा विषय गंभीरपणे घेतल्याचे भाजप नेते नरेश मोटघरे यांनी सांगितले. लवकरच प्रत्यक्ष भेट होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाघ की शेतकरी – कोण सुरक्षित?
वाघांचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्यांचे प्राण, त्यांची उपजीविका व जनावरे यांचे काय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. वाघाचा तात्काळ बंदोबस्त, पिंजरा लावणे, ग्रस्त वाढवणे व कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन जागे होणार की पुढील बळीची वाट पाहणार? हा प्रश्न आता संपूर्ण मौदा तालुक्याच्या ओठांवर आहे.




